शेतात जाऊन झोपला अन् परत कधी उठलाच नाही, अमळनेरमध्ये ३३ वर्षीय तरुणाचा भयानक मृत्यू

अमळनेरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. निंदणीसाठी शेतात गेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील निम गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वासुदेव रामसिंग पाटील असे त्या विवाहित तरुणाचे नाव होते. तो ३३ वर्षांचा होता. आईवडिलांसोबत तो शेतात निंदणी करण्यासाठी गेला होता. काम झाल्यानंतर त्याच्या आईवडिल घरी आले होते. पण तो मात्र तिथेच होता.

निंदणीची थोडे काम बाकी असल्यामुळे तो तिथेच थांबला होता. पण दुपारी झोप लागली म्हणून तो शेतातील एका झाडाखाली झोपला. खुप उशीर झाल्यावरही वासुदेव घरी न आल्यामुळे कुटुंबाला चिंता वाटू लागली.

अशात साडेचार वाजले तरीही वासुदेव घरी न आल्यामुळे त्याची आई त्याला पाहण्यासाठी शेतात गेली. आईने बघितले की तो शेतामध्ये झोपलेला आहे. त्यावेळी तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच हालचाल करत नव्हता.

त्यामुळे वासुदेवची आई खुप घाबरली. तिने तिथल्या आजुबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावले. त्यानंतर त्यांनी त्याला गाडीत टाकून एका रुग्णालयामध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

आकस्मित मृत्यू म्हणून वासुदेवच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पोलिस याचा तपास करत आहे. वासुदेवला आईवडिल, पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार होता.