पाकिस्तानून भारतात आलेली सीमा हैदर देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सचिन नावाच्या तरुणासाठी ती भारतात आली आहे. थोड्याच दिवसांमध्ये देशभरात ती फेमस झाली आहे. सोशल मीडियावरही दिवसभर तिचीच चर्चा होत असते.
ती तिच्या प्रेमासाठी चार मुलांना पाकिस्तानातून भारतात घेऊन आली आहे. त्यामुळे तिच्यावर चित्रपट निघणार असल्याची चर्चा आहे. यासाठी ऑडिशन देखील सुरु झाले आहे. इतकंच नाही तर सीमाही या चित्रपटात काम करणार आहे.
आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. अमेय खोपकर यांनी ट्विट करुन यावर भाष्य केलं आहे. तसेच असा सिनेमा बनवला जाऊ नये, असे म्हणत त्यांनी याला विरोधही केला आहे.
पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
सीमा ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? असे म्हणत अमेय खोपकरांनी निर्मात्यांवर निशाणा साधला आहे.
तसेच हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच, असे म्हणत अमेय खोपकरांनी निर्मात्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.