शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे हे वादात सापडले आहे. महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक नेते संताप व्यक्त करत असून अनेकांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
संभाजी भिडेंमुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. अनेक पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. याचा परीणाम पावसाळी अधिवेशनातही दिसून आहे. अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
संभाजी भिडेंना अटक करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले आहे. निवेदन देत असताना फडणवीस भिडेंचा गुरुजी म्हणून उल्लेख करत होते.
देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावरही अनेकांनी आक्षेप घेतला होता. तुम्ही संभाजी भिडेंना गुरुजी का म्हणत आहे? असे विरोधकांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना मला ते गुरुजी वाटतात. त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे, असे फडणवीसांनी म्हटले होते. पण गुरुजी हा उल्लेख अजित पवार यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरींना आवडलेला नाही. त्यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मी देवेंद्र फडणीसांचं भाषण ऐकलं. मी त्यावर हरकतही घेतली. असा नीच प्रवृत्तीचा माणूस कोणाचा गुरु असू शकेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे त्यांना कोणी गुरु मानू नये, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
संभाजी भिडे हे हिंदुत्वाचा प्रचार करतात. पण हिंदुत्व हे कुठल्याही जातीविरुद्ध प्रचार करायला सांगत नाही. हिंदुत्व महापुरुषांवर खालच्या पातळीवरची टीका करायला सांगत नाही. फडणवीसांनी त्यांना गुरु मानलं असेल तर तो त्यांच्या वैयक्ति प्रश्न आहे. पण अशा लोकांना गुरु मानणं हा गुरुपदाचा अपमान आहे, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.