Amravati Accident : एक डुलकी अन् १४ जणांचे आयुष्य उध्वस्त! दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांचा समृद्धीवर भीषण अपघात…

Amravati Accident : सध्या समृद्धी महामार्ग हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. समृद्धी महामार्ग जेव्हापासून वाहतुकीस खुला झाला आहे, तेव्हापासून अपघातांची मालिका सुरू आहे. रोज यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. या महामार्गावर आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे.

या महामार्गावर अजून एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 14 जण जखमी झाले आहेत.

याठिकाणी दीक्षाभूमीला जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, हा अपघात चालकाला झोप आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. शासनाने यावर उपाय योजनाही केल्या. तरीदेखील अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे.

याठिकाणी गाड्यांचा वेग देखील मोठ्या प्रमाणावर असतो. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीपासूनच हा महामार्ग चर्चेत आहे. अनेकांनी या महामार्गावर जीव गमावले आहेत.