रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली होती. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. २० जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त झाली आहे.
अनेकांनी आपले नातेवाईक या घटनेत गमावले आहे. त्यामुळे ते हंबरडा फोडताना दिसत आहे. या घटनेचा अनंत पारधी हा सुद्धा साक्षीदार होता. त्याने निसर्गाचं असं रुप कधीच बघितलेलं नव्हतं. त्यामुळे त्याची माणसं वाचली असली त्याने वाडीवर परत न येण्याचा निर्णय घेतला आहे.
घटना घडली तेव्हा अनंत आणि त्याचे कुटुंब घरात झोपलेले होते. त्यावेळी अचानक जोरात आवाज झाला आणि घरावर मातीचा ढिगारा पडला. छप्पर कुटुंबाच्या अंगावर पडले आणि सर्वजण त्याखाली दबले गेले. अर्धातास प्रयत्न करुन अनंत बाहेर आला आणि त्याने एक-एक करुन कुटुंबातील सर्व सदस्यांना बाहेर काढले.
घरामध्ये पत्नी, आईवडिल, पाहूणे, बहीण, तिचे पती, मुले असे एकूण आठ जण होते. बाहेर बघितलं तर काही दिसेनासे झाले. सर्वत्र अंधार आणि तो मुसळधार पाऊस. त्याने मदतीसाठी आवाजही दिला पण कोणीही त्याच्या मदतीसाठी धावून येईना. तेव्हा त्याला कळले की संपुर्ण वाडीवरच दरड कोसळली आहे.
अनंतचे तीन सख्खे भाऊ सुद्धा होते, पण त्यांचा मृत्यू झाला आहे. घर उद्ध्वस्त झाल्यानंतर हाताला काही लागते म्हणून अनंत आपल्या वस्तुचा शोध घेत होता. त्याचवेळी त्याच्या हातात सुटकेस लागली. तीच सुटकेस घेऊन तो वाडीवरुन निघाला आणि आता आपण कधीच वाडीवर परत यायचं नाही, असा निर्णय त्याने घेतला.
वाडीवर २२५ पेक्षा जास्त लोक होते. त्यामुळे १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल असा अंदाज अनंतने व्यक्त केला आहे. सध्या २० लोकांचे मृतदेह बचावपथकाला मिळाले आहे. अजूनही तिथली शोधमोहिम सुरुच आहे.