अनेकदा वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती मोटर वाहन निरीक्षक किंवा साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अशा तपासणी अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, यामुळे वाद वाढत जातो. तसेच अनेकदा शाब्दिक चकमक होते.
अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. अशा व्यक्तींवर कारवाई करताना अनेकदा अडचणी येतात. यामुळे आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन आयुक्त विभागाने प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्तव्यावर असणारे मोटर वाहन निरीक्षक व साहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांना अंगावरील गणवेशावर ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता जर कोणी विनाकारण त्रास दिला तर ठोस पुरावा उपलब्ध होऊन कारवाई करणे सोपे जाणार आहे. आता प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षक व साहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांना अंगावर परिधान करण्यासाठी ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यामुळे हुज्जत घालून गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींचे या ‘बॉडी कॅमेरा’द्वारे चित्रीकरण होणार आहे. वाहतूक पोलिसांना या आधीच बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. राज्यातील एक हजाराहून अधिक मोटर वाहन निरीक्षक व तेवढेच साहाय्यक मोटर निरीक्षक यांना दिले जाणार आहेत.
यामुळे या अधिकाऱ्यांबरोबर वाद घालणाऱ्यांनी आता सावध होणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे. अधिकाऱ्यांबरोबर वाद घालणाऱ्यांना सरकारने याद्वारे इशाराच दिला आहे. यामुळे नियम पाळणे गरजेचे आहे.