प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या एनडी स्टुडीओमध्येच जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
२५० कोटींच्या कर्जामुळे नितीन देसाई यांना असा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी २०१६ मध्ये १८० कोटींचे कर्ज घेतले होते. २०२३ मध्ये ते २५० कोटी रुपयांचे झाले होते. रसेश शाह यांची कंपनी एडलवाईज असेट रिक्रेशनकडून त्यांनी ते कर्ज घेतले होते.
नितीन देसाई यांनी जीवन संपवण्यापूर्वी ११ व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी ४ व्यवसायिकांची नावे घेतली होती. पोलिसांकडून त्याचाही तपास सुरु आहे. तसेच राज्यातील नेतेही यावर भाष्य करताना दिसून येत आहे.
रसेश शाह, एआरसी आणि एडलवाईज या कंपन्याची साधी चौकशी होता कामा नये. त्यांची विशेष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येत नितीन देसाई यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. नितीन देसाई यांच्या प्रकरणाचा सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी चर्चा होत असताना शेलारांनी यावेळी काही महत्वाचे मुद्दे मांडले होते.
ही आधुनिक सावकारी आहे. रिक्रेशन कंपनीकडून दिला गेलेला कर्जाच्या व्याजाचा दर तपासला गेला पाहिजे. याप्रकरणी कंपनी आणि रसेश शाहची सखोल चौकशी झाली पाहिजे. वेळ पडली तर विशेष चौकशी करावी, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनीही याप्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. नितीन देसाई या्ंना कोणत्या कंपनीने जाणीवपूर्वक फसवले का? जोरजबरदस्त झाली का? कंपनीने नियमाबाहेर जाऊन व्याज आकारलं का? या सर्वांची चौकशी केली जाईल, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.