बदलापूर प्रकरणात आरोपीच्या भावाचा मोठा गौप्यस्फोट, सगळा घटनाक्रमच सांगितला…

बदलापूरमधील शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सगळे हादरले आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.

आता आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबाने आरोप फेटाळले आहेत. त्याचा भाऊ बबलू शिंदे याने आपल्या भावावरचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण प्रकरण हे रचले आहे. माझा भाऊ निर्दोष आहे, परत चौकशी करा, बबलू शिंदेच्या मते, अक्षय शिंदे आणि त्यांचे कुटुंब त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते.

15 दिवसांपूर्वीच अक्षयने नोकरी स्वीकारली होती. जर त्याने असं काही केलं असतं, तर तो पुन्हा शाळेत कामाला आला नसता. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर मुलींची जबाबदारी कशी येऊ शकते? असेही त्याने म्हटले आहे. मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जाण्यासाठी तिथे तीन महिला सेविका होत्या.

हा संपूर्ण प्रकार रचलेला आहे. मुलींची आणि मेडिकल चाचणीची परत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी घराबाहेर आणि गावाबाहेर काढले. त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि घरातील सर्व मालमत्तेची नासधूस करण्यात आली, असेही त्याने म्हटले आहे.

आम्ही आता कुठे आहोत, हे सांगू शकत नाही, पण आम्ही कुठेतरी सुरक्षित स्थळी लपून आहोत, असे बबलूने सांगितले. त्याच्या भावाचा मुलींच्या अत्याचारासंबंधी कुठलाही दोष नाही आणि त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीत. आमची कोणाशी दुष्मनी नाही, पण कोणीतरी आम्हाला फसवत आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. विरोधक सध्या सरकारवर जोरदार टीका करत असून याबाबत अजून काय माहिती पुढे येणार हे लवकरच समजेल.