छत्रपती संभाजीनगरच्या बदनापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदनापूर येथील एका शाळेच्या परीक्षेचा निकाल कमी लागत होता. त्यामुळे शिक्षण विभागाचे पथक तपासणीसाठी गेले असता तिथे शाळाच नसल्याचे समोर आले आहे.
शिक्षण पथक तपासणीसाठी गेले असता शाळा, विद्यार्थी तिथे आढळून आलेले नाही. शाळेला युडायस क्रमांक नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी दहावीला विद्यार्थी बसवले कसे? तसेच शिक्षण मंडळाने याला मान्यता कशी दिली? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावी परिक्षेत निकालाचे प्रमाण काही शाळांचे खुप कमी लागले आहे. त्यांची तपासणी सध्या शिक्षण मंडळाकडून केली जात आहे. त्यामध्ये त्यांना १५ शाळा आढळून आल्या आहे.
बदनापूर येथील अशाच एका शाळेची तपासणी करण्यासाठी शिक्षण मंडळाचे पथक गेले होते. ते छत्रपती शिवाजी माध्यमिक आश्रम शाळेला भेट देणार होते. ते पत्त्यावर पोहचले. पण त्यांना शाळाच भेटत नव्हती.
त्यानंतर शिक्षण मंडळाने याबाबत संबंधित ठिकाणच्या शिक्षणााधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांना याबाबत कळवले. त्यांनी शाळेचा शोध घेण्याचे आणि पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहे. तपासणी पथकातील शिरसागर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
संबंधित ठिकाणी शाळा पाहण्यासाठी आम्ही गेलो. पण तिथे काही इमारत आढळली नाही. तसेच शाळेचा युडायस क्रमांक नाहीये. युडायस क्रमांक शाळांसाठी आवश्यक असतो. पण तिथे शाळाच अस्तित्वात नसल्यामुळे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला कसे बसले? या शाळेला शिक्षण मंडळाने कोणत्या आधारे मान्यता दिली? असे शिरसागर यांनी म्हटले आहे.