केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे आता सगळे पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना होईल.
तसेच 29 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. अशी माहिती देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा केली. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला होता. तेव्हाच विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, याचे संकेत मिळाले होते. सोमवारी दुपारीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत टोलमाफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले होते.
याशिवाय, आज दुपारी १२ वाजता राज्यपालनियुक्त ७ आमदारांचा विधानभवनात शपथविधी पार पडेल. यानंतर लगेच दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.