राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रस्त्यावर हल्ला झाला आहे. तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरुन हा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी याबाबत आंदोलन देखील केले होते.
संभाजीराजे यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता.
त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज दौऱ्यावर होते. ते ठाण्याच्या दिशेला जात असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यावर संभाजीराजे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे यांचे रक्त तपासावे लागेल, असे आव्हाड यांनी म्हटले होते. यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करत काही लोकांच्या जमावाने जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला केला आहे.
तीन कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. याबाबत पोलीस तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमोल मिटकरी यांच्या गाडीवर देखील हल्ला करण्यात आला होता.