गेल्या काही दिवसांपासून IAS पूजा खेडकर चर्चेत आली आहे. यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला दणका दिला आहे. यामुळे पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. तिला केव्हाही अटक करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
आता अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीतच असलेली पूजा खेडकर आता दुबईला पळाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पूजा खेडकर अटकेच्या भीतीनं दुबईला पळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत आता पोलीस तपास सुरू आहे.
पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पुणे पोलीस तिच्या मागावर होते. आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे. दिल्लीत ती बड्या नेत्याच्या घरी देखील गेल्याची माहिती आहे. पूजा खेडकरचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ती भारतातून थेट परदेशात पसार झाली असावी, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
असे असले मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पूजा खेडकर वरती अनेक आरोप करण्यात आले आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्गातून पूजाने खेडकरने १२ वेळा UPSC परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. तिचे अनेक कारनामे पुढे आल्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
त्याचबरोबर पूजा खेडकरला मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये देखील गैरवर्तन केल्यामुळे तब्बल आठ वेळा मेमो देण्यात आल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेसाठी त्यांचे नाव लिहिताना सातवेळा फेरफार केल्याचे देखील पुढं आलं आहे.
इतकेच नव्हे तर पूजा खेडकर यांनी वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचे समोर आला आहे. पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला आहे. पूजा खेडकरचे अनेक कारनामे समोर येत असल्याने आता तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.