गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
याबाबत पोलीस तपास करत असून पहाटे राहत यांचे वडील झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
दरम्यान, पत्नीची हत्या केल्यानंतर राहत यांचा पती आरोपी तायमिन शेख याने पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व घटना सांगितली. त्याला लगेच अटक करण्यात आली. या घटनेने मात्र खळबळ उडाली असून राहत सय्यद यांचे वडील अज्जू सय्यद हे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
या घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहत सय्यद यांचा पती तायमिन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती.
नुकताच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर तायमिन आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते. त्यांच्यात काही वाद होता का याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. राहतच्या पश्चात आई, वडील आणि दोन मुलं आहेत. या घटनेने कुरखेड्यात खळबळ माजली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.