चंद्रपुरातील अंदाधुंद गोळीबारात भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

चंद्रपुरच्या राजुऱ्यात रविवारी रात्री गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वाशा डोहे यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी राहणारे कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी झाले आहे.

या गोळीबारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून पोलिस याप्रकरणी तपास करत आहे. कोळसा तस्करीतून हा गोळीबार झाल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी त्यारात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेतले आहे.

संबंधित घटना ही राजूरामधील सोमनाथपूर वार्डामध्ये घडली होती. रविवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने सचिन डोहे यांच्या घरी गोळीबार केला. त्यामध्ये पूर्वाशा यांचा मृत्यू झाला, तर शेरगिल हे गंभीर जखमी झाले. गोळीबाराच्या काही तासानंतर आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती.

पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहे. त्यांनी अजूनही आरोपीचे नाव जाहीर केलेले नाही. चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर लगेचच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

या गोळीबारात लल्ली शेरगिल गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक तातडीने त्यांच्या मदतीला धावून गेले होते. त्यांना चंद्रपूर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राजूरा येथे झालेली घटना दुर्देवी आहे. पोलिसांनी याची चौकशी करुन गुन्हेगारांचा अहवाल सादर करत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे चंद्रपुर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.