जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.
हे आंदोलन मागे घेण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपचे संकटमोचक मैदानात उतरले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आता याठिकाणी जाणून त्यांनी चर्चा केली आहे. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.
महाजन यांच्याकडून मनोज जरांगे यांना उपोषण मागं घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. ते म्हणाले, आमच्या गावातील ६० जणांना उचलले जात आहे. पोरांना जेलमध्ये नेले जात आहे. केसेसचा विषय होत नाही, बडतर्फ केलं जात नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, आपल्या सरकारने आरक्षण दिले होते. मात्र, सरकार गेल्यानंतर आरक्षण गेले. यावर जरांगे यांनी आम्ही लोकं पाठवतो त्यांच्याशी चर्चा करा, असे म्हटले. आम्हाला आरक्षण कसं गेलं त्यात पडायचं नाही, मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या, असेही ते म्हणाले.
यावर मराठवाड्याला आरक्षण दिल्यास ते कोर्टातील पहिल्या सुनावणीला देखील टीकणार नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तसेच गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना एक महिना वेळ देण्याची मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणी सरकार टीका होत असून दबाव वाढत आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या आणि विषय संपवा, जीआर काढा, असं मनोज जरांगे म्हणाले, यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.