रुम लॉक होता, नितीन देसाई दोरीला लटकलेले, आणि..; बॉडीगार्डने केले धक्कादायक खुलासे

बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपवले आहे. नितीन यांनी बुधवारी पहाटेच्या दरम्यान हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नितीन देसाई हे त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आपले जीवन संपवले आहे. आपल्या डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी असा निर्णय घेतला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई हे रात्री उशिरा त्यांच्या स्टुडिओमध्ये गेले होते. सकाळी खुप वेळ झाल्यावरही ते बाहेर न आल्यामुळे त्यांचा बॉडीगार्ड आणि इतर लोकांनी दरवाजा ठोठावला होता. पण दरवाजा कोणीही उघडला नाही.

बॉडीगार्डने खिडकीतून पाहिले तर बॉडीगार्डला धक्काच बसला. नितीन देसाई दोरीला लटकलेले होते. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

गेल्या काही वर्षांपासून देसाई आर्थिक संकटांना तोंड देत होते. त्यांच्यावरचे कर्ज दिवसेंदिवस वाढत होते. २४९ कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्यावर होते, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे वाढत्या दबावामुळे त्यांनी असे केल्याची माहिती समोर आली आहे.

नितीन यांनी १९८९ मध्ये ‘परिंदा’ या चित्रपटातून कला दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे सेट तयार केले होते. त्यांनी डिझाइन केलेल्या प्रसिद्ध चित्रपटांच्या सेटमध्ये प्यार तो होना ही था, हम दिल दे चुके सनम, मिशन कश्मीर, राजू चाचा, देवदास, लगान यांचा समावेश आहे.

नितीन देसाई यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर २००५ साली ५२ एकरात एनडी स्टुडिओची स्थापना केली होती. एनडी स्टुडिओमध्ये इनडोअर, आउटडोअर शूटिंग पर्याय देखील उपलब्ध आहेत. शूटिंग व्यतिरिक्त, एनडी स्टुडिओ पर्यटकांसाठीही एक आवडते ठिकाण आहे.