बंधुप्रेम! लहान भावाचा मृत्यू, तासाभरात मोठ्यानेही जीव सोडला, घटनेने अख्ख गाव गहिवरलं

राजस्थानच्या पाली (Pali) जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. पाली जिल्ह्याच्या रुपवास गावात चार भावांचे अनोख्या प्रेमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे. या चौघांमधील दोन भावांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, रुपवास गावात चार भाऊ एकत्रित आपल्या कुटुंबासोबत राहतात. या चौघांमध्ये ज्येष्ठ बंधू बुधाराम हे होते. त्यांच्यानंतर मंगलराम, तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ दुर्गाराम आणि सर्वात लहान भाऊ मांगीलाल.

या चारही भावांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यांच्या बंधुप्रेमाची सर्वत्र चर्चा आहे. मोठा भाऊ 90 वर्षांचा तर सर्वात लहान भाऊ 75 वर्षांचा. असे असताना काही दिवसांपुर्वीच त्यांच्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.

तीन नंबरचा भाऊ दुर्गाराम यांची प्रकृती काही दिवसांपूर्वीच खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला. दुर्गाराम यांच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ बुधाराम प्रचंड दुःखी झाला. यामुळे बुधारामची प्रकृतीही ढासळली. त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचेही निधन झाले.

केवळ तासाभरात दोन भावांच्या निधनाने या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. क्षुल्लक कारणावरुन सख्खे भाऊच पक्के वैरी झाल्याच्या अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात.

असे असताना मात्र या भवांच्या बाबतीत प्रेम वेगळेच होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला आलेला प्रत्येक जण कलयुगातील राम- लक्ष्मण, असे म्हणत आपले दुःख व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळाले.