बुलढाणा अपघाताचे सत्य आले समोर; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादाक माहिती उघड, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…

गेल्या वर्षभरापासून समृद्धी महामार्ग चांगलाच चर्चेत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन करण्यात आले होते. पण त्यानंतर हा रस्ता अपघातामुळेच जास्त चर्चेत राहिलेला आहे.

काहीच महिन्यात या महामार्गावर हजाराहून अधिक अपघात झाले असून अनेकांचा यामध्ये जीवही गेला आहे. शनिवारीच या महामार्गावर एक अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत अनेक अंदाज लावले जात होते. अनेकांनी तर या अपघाताबाबत संशयही व्यक्त केला होता.

आता या अपघाताचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात झालेला हा अपघात खुप भीषण होता. या अपघातात बसला भीषण आग लागली होती. त्यामुळे २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे या अपघाताबाबत अनेक अंदज लावण्यात येत होते. पण या अपघाताचे खरे कारण आता समोर आले आहे.

मुंबईची संस्था फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टिगेटर्स हिने या अपघाताचा तपास केला आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचा अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. वाहतुकीचे नियम मोडत ही बस धावत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

सुरुवातीला बस महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती. जी ओव्हरटेकिंग लेन असते. यावेळी बसची गती ७० ते ८० किलोमीटर प्रतितास अशी होती. त्यामुळे आधी या बसचे पुढचे चाक साईन बोर्डला जाऊन धडकले. त्यानंतर बस १० फुट लांब असलेल्या दुभाजकाला धडकली होती.

हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे बसचे मागील टायरही फुटले. त्यामुळे बस एका बाजूला झुकली. अशात बसचा एक्सेल तुटून वेगळा झाला. तो डिझेल टँकवर आदळल्यामुळे डिझेल टँक फुटला. ते डिझेल सर्वत्र पसरताच त्याने पेट घेतला. त्यामुळे २५ जणांचा होरपळून मिळून मृत्यू झाला, असे या अहवालातून सांगण्यात आले आहे.