राज्यात सध्या सर्वत्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होत आहे. लवकरच विस्तार होईल असे सातत्याने सत्ताधारी नेते सांगताना दिसून येत आहे. पण नुकतेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी लांबण्याची शक्यता आहे.
शिंदे गटातील आमदार वारंवार हे बोलताना दिसून येत होते की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण खातेवाटप आणि त्याच्यातील फेरबदल झाल्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडणार आहे. लवकरच पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्यानंतर हा विस्तार होण्याची शक्यता असेल.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यांच्या ९ मंत्र्यांनी शपथही घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. पण खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाते देण्यात आले आहे.
शिंदे गटातील आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट हे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे ठामपणे सांगत होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणार असल्याचेही बोलून दाखवले होते. आपण कॅबिनेट मंत्री होणार असून रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनही काम करणार असल्याचे भरत गोगावले यांनी म्हटले होते.
अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर खातेवाटप केले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजप आणि अपक्ष आमदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सध्या मंत्रिमंडळामध्ये २ उपमुख्यमंत्री आहे तर २७ कॅबिनेटमंत्री आहे. नियमानुसार राज्य सरकारला ४३ मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करता येऊ शकतो. त्यामुळे आता पाहिले तर फक्त १४ जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यापैकी १० पदे ही राज्यमंत्र्यांची असतील तर ४ कॅबिनेट मंत्र्यांची असतील.
अशात राजकीय स्थिती पाहिली तर इच्छुकांची संख्या जास्त आहे. कारण भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्षातील आमदारांना मंत्रिपद हवं आहे. त्यामुळे या १४ जागांसाठी तिन्ही पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे हा वाद टाळण्यासाठीच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न केले जात आहे.