मोठी बातमी! नितीन देसाई मृत्यू प्रकरणात ‘या’ ५ व्यक्तींवर गुन्हा दाखल, बड्या हस्तींच्या नावांनी खळबळ..

नितीन देसाई यांच्या निधनाची पोलिस चौकशी करत आहे. त्यांनी जीवन संपवण्यापूर्वी काही व्हाईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्यांचा तपास रायगड पोलिस करत आहे. आता नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनीही पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे.

नेहा देसाई यांनी या जबाबादात एडलवाईज या कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. त्या कंपनीने कशाप्रकारे नितीन देसाईंना कर्जाची ऑफर दिली होती. त्यानंतर त्यांनी कशाप्रकारे नितीन देसाईंना फसवलं याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.

२००४ साली एनडी स्टुडिओच्या सुरुवातीसाठी आम्ही अडीज लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड आम्ही मुदतीमध्ये केली होती. त्यानंतरही आम्ही स्टुडिओंच्या कामासाठी कर्ज घेतले होते. तेही आम्ही मुदतीमध्ये फेडले होते. त्यामुळे कर्ज घेऊन फसवण्याचा आमचा हेतू कधीच नव्हता, असे नेहा देसाई यांनी म्हटले आहे.

२०१६ मध्ये नितीन देसाई यांच्या कामाची गुणवत्ता बघून कौशल्य बघून ए़डलवाईज कंपनीने आम्हाला कर्जाची ऑफर दिली होती. रसेश शाह हे नितीन देसाईंना भेटले होते. आपण स्टुडिओमध्ये गुंतवणूक करुन वेगवेगळ्या मोठ्या संकल्पना डेव्हलप करु शकतो, असे सांगत ऑफर दिली होती, असे नेहा देसाईंनी म्हटले आहे.

२०१६ मध्ये १५० कोटी आणि नंतर ३५ कोटी रुपयांचे कर्ज आम्ही घेतलं होतं. त्यासाठी एनडी स्टुडिओची जमीन तारण ठेवण्यात आली होती. पण २०१९ मध्ये कंपनीने आगाऊ सहा महिन्यांचे हफ्ते भरण्यासाठी दबाव टाकला होता, असा गंभीर आरोप नेहा देसाईंनी यावेळी केला आहे.

२०२० मध्ये कोविडचं संकट आल्यामुळे स्टुडिओमधील सर्व कामे बंद झाली होती. त्यामुळे हफ्ते भरण्यास थोडा वेळ लागत होता. अशावेळी सुद्धा नितीन देसाई हफ्ते भरण्यासाठी तयार होते. पण कंपनीकडून त्यांच्यावर हफ्ते वेळेत भरण्याचा दबाव टाकला जात होता, असे नेहा देसाई यांनी म्हटले आहे.

तसेच नितीन देसाई यांनी वनटाईम सेटलमेंटचा प्रस्ताव कंपनीकडे दिला होता. पण ते चालढकल करत होते. नितीन देसाई वारंवार त्यांच्याशी संपर्क साधत होते. पण नीट रिस्पॉन्स येत नव्हता. त्यानंतर कर्जाची रक्कम वाढल्यानंतर चर्चा न करता कंपनीने थेट कोर्टामध्ये धाव घेतली, असा गंभीर आरोपही नेहा देसाई यांनी केला आहे.

काही कंपन्या स्टुडिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार होत्या. पण त्या कंपनीने हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ते प्रचंड तणावामध्ये गेले होते. एकदा तर आम्ही घरात दोघेच असताना ते माझ्यासमोर रडले सुद्धा होते. कोर्टाने २५ जुलैला एनडी स्टुडिओ आर्ट्स ही कंपनी दिवाळखोर म्हणून घोषित केली होती, असे नेहा देसाई यांनी म्हटले आहे.

जितेंद्र कोठारी हे प्रशासक असताना सुद्धा कंपनीच्या म्हणण्यानुसार काम करत होते. २८ जुलैला त्यांनी मेल करुन कागदपत्रांची मागणी करायला सुरुवात केली होती. तसेच मी खाजगी बाऊंसर घेऊन येतोय, मला स्टुडिओचा ताबा घ्यायचाय, असे ते सांगत होते. यामुळे नितीन देसाई खुप तणावात होते, असे नेहा देसाईंनी जबाबात म्हटले आहे.

तसेच स्टुडिओ ताब्यात घेऊन तिथे खाजगी व्यवसायिक बांधकाम त्यांना करायचे होते, हे स्पष्ट दिसत होते. अडवणुक होत असल्यामुळे देसाईंचे चालु प्रोजेक्ट्स बंद पडत होते. तसेच नवीन प्रोजेक्टसही येत नव्हते. यामुळे जवळपास १०० कोटींचे नुकसान देखील झाले होते.

रसेश शाह, चेअरमन केयूर मेहता, स्मित शाह, ईआरसी कंपनीचे आर के बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांनी माझ्या पतीला खुप त्रास दिला, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असेही नेहा देसाई यांनी म्हटले आहे.