वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने भडकला चहल; आता भारताबाहेरील ‘या’ संघातून खेळणार क्रिकेट

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे आता त्याने एक वेगळा निर्णय घेतला आहे. त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चहल कौंटी संघ केंटकडून खेळू शकतो. चहलचे हे कौंटी क्रिकेटमधील पदार्पण असू शकते.

यामुळे याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वर्ल्ड कपसाठी निवड न झाल्याने चहलने कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला ना हरकत प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

केंट कौंटी क्लब क्रिकेट लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल. चहल त्याच्यासाठी तीन-चार दिवसीय सामने खेळणार आहे. तसेच जेव्हा भारतीय संघाला त्याची गरज असते तेव्हा तो लगेचच भारतीय संघात सामील होईल, असेही सांगितले जात आहे.

चहलला आता संघात फार कमी संधी दिल्या जात आहेत. सध्या खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकासाठीही चहलला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर त्याला विश्वचषक संघापासूनही दूर ठेवण्यात आले. 2023 मध्ये आतापर्यंत चहलने केवळ 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

ज्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. त्याला प्रामुख्याने एकदिवसीय संघापासून दूर ठेवण्यात आले आहे. चहल भारताकडून पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत 72 एकदिवसीय आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 27.13 च्या सरासरीने 121 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय चहलने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25.09 च्या सरासरीने 96 विकेट्स घेतल्या आहेत. जून 2016 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.