ऐतिहासिक चित्रे, वस्तु, शस्त्र अशा अनेक गोष्टी संग्रहालयात ठेवल्या जातात. अनेक गोष्टींबद्दल आपल्याला माहितीही नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टींबद्दल लोकांना जाणून घ्यायला आवडत असतं. अशातच त्यांचा संबंध असलेली एक खास गोष्ट न्युयॉर्कमध्ये सापडली आहे.
शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजीराजे जाधव यांचे चित्र अमेरिकेच्या न्युयॉर्कमध्ये सापडलं आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी १६२२ साली हे चित्र काढण्यात आले होते. लखुजीराजे हे इतिहासातील महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
हे चित्र न्युसॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. इतिहासतज्ज्ञ मनोज दाणी यांना हे चित्र इथे सापडले आहे. हे चित्र हाशिम नावाच्या एका चित्रकाराने काढले होते. तो व्यक्तिचित्रांसाठी प्रसिद्ध होता. या चित्रावर त्याचे नावही आहे.
जादूराय हा खिताब लखुजीराजे यांना मिळाला होता. तसेच नाव चित्रात असलेल्या कपड्यावरही आहे. त्यामुळे हे चित्र लखुजीराजे यांचेच असल्याचे सिद्ध होते. न्युयॉर्कच्या या म्युझियममध्ये बादशाही अल्बम नावाचा एक संग्रह आहे. त्यामध्ये अनेक सरदारांची चित्रे जतन करुन ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये लखुजीराजे यांचेही चित्र आहे.
सुरुवातीला हा संग्रह दिल्लीमध्ये होता. पण १८०२ साली मराठा साम्राज्याचा अस्त होत असताना इंग्रजांनी मराठ्यांकडून दिल्ली काबीज केली. त्याबरोबर संग्रही इंग्रजांच्या हाती लागला. त्यानंतर इंग्रजांनी या संग्रहातील चित्रांच्या नवीन प्रत तयार केल्या होत्या.
नवीन प्रत तयार करण्यासाठी त्यांनी खास दिल्लीतील चित्रकारांची मदत घेण्यात आली होती. त्यानंतर तो संग्रह दिल्लीतच ठेवण्यात आला होता. पण पुढे एका पाश्चिमात्य ग्राहकाने दिल्लीतील आर्ट डिलरकडून हा संग्रह विकत घेतला होता. अशाप्रकारे ते चित्र भारताबाहेर पोहचले होते.