चिमणीमुळे भाजपची चिंता वाढली, प्रणितींनी फडनवीसांची सगळी गणित चुकवली, सोलापूरमध्ये भाकरी फिरणार?

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची लेक प्रणिती शिंदे विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतील नेते राम सातपुते असा सामना होत आहे. यामुळे रंगत वाढली आहे.

यावेळी बसोलापूर लोकसभा मतदारसंघात ५७.४६ टक्के इतकं मतदान झाले. याठिकाणी अक्कलकोट, पंढरपूर, उत्तर सोलापूर या भागातून प्रणिती शिंदेना फटका बसण्याची शक्यता आहे. तर राम सातपुते यांना सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघांमध्ये फटका बसेल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, हे दोघेही तगडे उमेदवार असल्याने नेमकं कोण निवडून येईल याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. यामुळे आता 4 जुनची वाट बघावी लागणार आहे. असे असले तरी प्रणिती शिंदे या स्थानिक उमेदवार म्हणून त्यांचे पारडं जड मानलं जातं आहे.

नागरिकांमध्ये प्रणिती शिंदेंबद्दल सोलापूरची लेक अशी प्रतिमा निर्माण करण्यात काँग्रेसला यश आले आहे. यामुळे आता दोन वेळा झालेला पराभव यावेळी खंडित राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रणिती शिंदेच काँग्रेसच्या उमेदवार असणार हे जवळपास निश्चित होते.

तशी माहिती त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे प्रणिती तीन महिने आधीपासूनच मतदारसंघात कामाला लागल्या. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. तसेच अनेक मुद्दे पुढे केले. गेल्या 5 वर्षात खासदार फिरकले नाहीत, हा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला.

सातपुतेंची उमेदवारी बरीच उशिरा जाहीर झाली. त्यामुळे त्यांना मतदारसंघात फिरण्यास फारसा वेळ मिळाली नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्याची चिमणी भाजपला त्रासदायक ठरली. कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी भाजप विरोधात लिंगायत समाजाला एकत्रित केले आणि प्रणिती शिंदेना पाठिंबा दिला.