भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची मालिका खेळत आहे. सध्या दोन्ही संघ १-१ च्या बरोबरीने खेळत असून तिसरा सामना १ ऑगस्टला होणार आहे. त्या सामन्यावरुन ही मालिका कोण जिंकेल हे स्पष्ट होणार आहे.
सर्वांचे लक्ष भारतीय संघाकडे असतानाच भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. सर्वात वयस्कर असलेले क्रिकेटर रुस्तम सोराबजी कूपर यांचे निधन झाले आहे.
सोराबजी हे १०० वर्षांचे होते. ते भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. रुस्तम यांचे मंगळवारी रात्री झोपेदरम्यानच मृत्यू झाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ट्विट करुन ही दु:खत बातमी दिली आहे.
क्रिकेट विश्वामध्ये त्यांना रुसी कूपर म्हणून ओळखले जायचे. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स बनवले होते. १४ डिसेंबरला त्यांनी आपला १०० वाढदिवस साजरा केला होता. पण मंगळवारी रात्री झोपेत असतानाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे.
रुस्तम कूपर यांनी २२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५२.३९ च्या सरासरीने फलंदाजी केली होती. त्यामध्ये त्यांनी १२०५ धावा केल्या होत्या. या २२ सामन्यांमध्ये ३ शतकेही ठोकली होती. ते इंग्लंडच्या हॉर्नर्स क्लबकडून सुद्धा खेळले होते.
रुस्तम कूपर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. ते मुंबई, मिडलसेक्स आणि पारशीसह इतर संघांसाठी क्रिकेट खेळले होते. १९४३-४४ आणि १९४४-४५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये रुस्तम यांची सरासरी ७६.६० आणि ९१.८३ होती. १९४५ च्या सिजनमध्ये मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.