पैशांअभावी मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाल्यावरून खचलेल्या पित्याने घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोयगावात ही घटना घडली असून बापलेकीच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, वैष्णवी राऊत (वय १९ वर्षे) मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दीपक प्रल्हाद राऊत (वय ४५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत स्थानिकांनी माहिती देताना सांगितले की, सोयगाव नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक प्रल्हाद राऊत यांना फेब्रुवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. यामुळे ते तणावात होते.
असे असताना या काळात त्यांची मुलगी वैष्णवी हिला पोटात त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या उपचारासाठी निलंबन काळातील अर्धा पगार द्यावा, असा अर्ज २६ मार्च रोजी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे दीपक राऊत यांनी दिला होता. मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत.
त्यांना अर्धे वेतन मिळाले नाही. वैष्णवीच्या पोटदुखीचा त्रास वाढल्यामुळे तिला २ एप्रिल रोजी रात्री जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३ एप्रिल रोजी वैष्णवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती कोमात गेली. ७ एप्रिल रोजी पहाटे वैष्णवीचा दुःखद मृत्यू झाला.
यामुळे तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्याजवळ पैसे नव्हते म्हणून आपली मुलगी गेली, या अपराधी भावनेतून दीपक राऊत हे अस्वस्थ झाले होते. ते एकदम शांत झाले होते. यातून त्यांनी आयुष्य संपवण्याच्या निर्णय घेतला.
अपराधी भावनेतून त्यांनी रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. त्यामुळे त्यांचे नातेवाईक व नागरिक यांना मोठा धक्का बसला. याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली.
दरम्यान, राऊत यांचे वेतन थांबवून त्यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व दीपकच्या पत्नीला शासकीय नोकरी द्या, या मागणीसाठी नातेवाइकांनी आक्रोश आंदोलन सुरू केले. नगरपंचायत समोरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.