दिल्लीत ‘ती’ गोष्ट घडल्यमुळे प्रचंड तणावात होते नितीन देसाई, कर्जतला आले अन् जीवनच संपवलं

बुधवारी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्यांनी आपल्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले आहे. कर्जामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते.

नितीन देसाई दिल्लीला गेले होते. ते रात्री उशिरा मुंबईमध्ये आले. त्यानंतर रात्रीच ते कर्जतच्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गेले. तिथे त्यांनी मॅनेजरशी व्हॉईस रेकॉर्डर घेतला आणि काही व्हॉईस नोट्स रेकॉर्ड करुन जीवन संपवले.

नितीन देसाईंनी दिल्लीला जाऊन आल्यानंतर असे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे दिल्लीला नक्की त्यांच्यासोबत काय झालं? असा प्रश्नही सर्वांना पडला आहे. आता ते दिल्लीला का गेले होते त्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कोर्टाच्या बेंचकडे त्यांनी होणाऱ्या कारवाईबाबत अपील केलं होतं. मुंबई एनसीएलटी कोर्टाने दिलेल्या कायदेशीर कारवाईच्या आदेशाविरोधात त्यांनी दिल्ली कोर्टात याचिका दाखल केली होती.

दिल्ली एनसीएलटीकडून या कारवाईला स्थगिती मिळेल अशी अपेक्षा होती. पण दिल्ली कोर्टाने मुंबई कोर्टाचा आदेश कायम ठेवला. हा नितीन देसाईसाठी मोठा धक्का होता. स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. पण कारवाई होणार हे निश्चित झालं होतं. त्यामुळे ते तणावात आले होते.

त्यामुळे नितीन देसाई त्याचदिवशी विमानाने मुंबईला परत आले. त्यानंतर ते रात्रीच कर्जतच्या स्टुडिओमध्ये गेले. त्यानंतर तिथेच त्यांनी जीवन संपवले. २०१६ मध्ये नितीन देसाई यांनी एका कंपनीकडून १८० कोटींचे कर्ज घेतले होते. ते कर्ज २०२३ पर्यंत २५० कोटी झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.