नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांची परिषद सुरु असतानाच एका डॉक्टरला तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नेरुळ येथे ही घटना घडली आहे.
विशेष म्हणजे या परिषदेसाठी २५ पेक्षा जास्त डॉक्टर उपस्थित होते. असे असतानाही एकाही डॉक्टरला त्यांचा जीव वाचवता आला नाही. अभय उप्पे असे त्या डॉक्टरांचे नाव होते. या घटनेमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेरुळमधील एका हॉटेलमध्ये डॉक्टरांसाठी एक परिषद बोलण्यात आली होती. यावेळी डी व्हाय पाटील रुग्णालयातील छाती व श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभय उप्पे हे मार्गदर्शन करत होते. मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं.
आपल्याला काय होत आहे? हे अभय उप्पे यांनाही कळत नव्हतं. त्यामुळे ते घरी जाण्यासाठी निघाले होते. पण हॉटेलच्या लिफ्टजवळ असल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागले. त्यांच्या छातीत कळ आली आणि अचानक ते जमिनीवर कोसळले.
तिथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी उप्पे यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांना तातडीने सीपीआर देण्यात आला. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिकाही बोलवण्यात आली. रुग्णवाहिकेत असतानाही त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत होते.
अपोलो रुग्णालयात अभय उप्पे यांना दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे खुप प्रयत्न केले. पण त्यांचा जीव वाचवू शकले नाही. अनेक नामवंत डॉक्टर त्यावेळी उपस्थित होते. पण तरीही त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.