Dream 11 : गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकले आहे.
नंतर ही बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे ड्रीम ११ वर करोडपती झाले आहेत. नुकताच झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड त्यांच्या ड्रीम इलेव्हनची टीम अव्वल आली.
दरम्यान, सोमनाथ झेंडे यांना यामध्ये दीड कोटी रुपये मिळाले आहेत. यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. मात्र आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत माहिती समोर आली आहे. आता त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाइन जुगार खेळणारे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. त्यांच्या या पत्राची काही तासातच पोलिसांनी देखील दखल घेतली आहे.
याबाबत आम्ही कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. झेंडे यांची चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दीड कोटी जिंकल्यानंतर सब इन्सपेक्टर करोडपती झाले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबही खूश झाले आहे. तरीही ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचे झेंडे यांनी सांगितले आहे. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.