तरुणांची लग्न लावून देण्यासाठी ही निवडणूक लढणार!! माढ्यातील उमेदवाराने केली मोठी घोषणा…

माढा लोकसभा निवडणुकीत वंचितच्या एका उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची सगळ्या जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे. माढा मतदारसंघातील अविवाहित तरूणांची लग्न करणं हेच माझं लक्ष असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने सांगितले आहे. याठिकाणी वंचितचे उमेदवार रमेश बारस्कर यांनी तरुणांसाठी ही घोषणा केली आहे.

या घोषणेची सध्या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या उमेदवाराने इतर सर्व प्रश्नांना बगल देत, थेट अविवाहित तरूणांची लग्न लावून देणं हा माझ्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न मी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे.

याबाबत ते म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरूणांची वेळेवर लग्नं होत नाही. त्यामुळे समाजात मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे हा एक अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

लग्न होत नसल्याने तरूणांमध्ये नैराश्य आले आहे. इतर सामाजिक प्रश्नांपैकी हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. अविवाहित तरूणांच्या लग्नांची वाढती समस्या सोडविण्यासाठी मी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याठिकाणी महिलांच्या हाताला काम नाही. तरुण मुलांना लग्नाचे वय झालेले असतानाही मुलगी मिळत नाही. लग्न करायच्या वयात तरुणांचे लग्न होत नाही. हा फक्त माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. या प्रश्नावर मी काम करणार आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरुन चर्चेत आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केला आहे. भाजपच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट देखील होती. याठिकाणी अजून उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे.