३२ वर्ष निवडणूक लढले, दरवेळी पराभव; अखेर ५१ व्या वर्षी सरपंचपदाचा गुलाल, उमेदवार ढसाढसा रडत म्हणाला…

नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये अनेकांना धक्का बसला तर काहींनी मैदान मारले. असे असताना आता एका ग्रामपंचायत निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. याठिकाणी वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले.

असे असताना तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ५१ व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत थेट सरपंचपदाला गवसणी घातली. पोपट पुंड असं या विजयी उमेदवाराचं नाव आहे. यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीमध्ये हे चित्र बघायला मिळाले आहे. त्यांच्या विजयानंतर अख्ख्या गावाने जोरदार घोषणाबाजी करत गुलालाची मुक्त उधळण केली. तसेच कार्यकर्त्यांनी पुंड यांना खांद्यावर नाचवत आनंद साजरा केला.

या ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांची सत्ता गेली अनेक वर्षे होती. या प्रस्थापित सत्तेला शह देण्याचे काम पोपट पुंड गेली अनेक वर्षे करत होते. अनेकदा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

असे असताना यंदा त्यांनी विजयी गुलाल उधळला आहे. त्यांनी २००२ ला पंचायत समिती, तर २०१४ ला सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवली. असे असताना त्यांना थोड्याफार मतांनी ३२ वर्षे पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, वयाच्या ५१ वर्षी त्यांचे निवडणुकीतील अपयशाचे ग्रहण सुटले आणि ते सरपंच झाले. यामुळे एकच जल्लोष करण्यात आला. सातत्याने पराभव पाहावा लागत असला तरी त्यांनी जिद्द सोडली नव्हती. यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू आले होते.