काही दिवसांपूर्वी मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर रुळावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चुकून एका महिलेला धक्का लागल्यामुळे त्या महिलेने आणि तिच्या पतीने त्याला मारहाण केली होती. त्यामुळे तो रुळावर पडला होता. त्यानंतर एका रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला होता.
दिनेश राठोड असे त्या तरुणाचे नाव असून तो मुळचा वाशिमचा होता. त्याची काहीही चुकी नसताना त्याला इतकी मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्याला यामध्ये जीवही गमवावा लागला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाने यावर संताप व्यक्त केला आहे.
तिथे स्टेशनवर इतकी गर्दी होती, पण एकाही बघ्याने दिनेशला मदतीचा हात का दिला नाही? असा सवाल त्याच्या कुटुंबाने उपस्थित केला आहे. दिनेश राठोड हा वाशिमच्या किनखेडचा होता. तो मुंबईमध्ये बेस्ट बसचालक म्हणून काम करत होता.
दिनेशच्या घरची आर्थिकस्थिती खुपच खराब होती. त्याच्यावर संपुर्ण कुटुंब चालत होतं. अशात कुटुंबाने मुलगा गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता त्याच्या कुटुंबाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
दिनेश १३ ऑगस्टला घणसोली येथील घरी येत होता. त्यासाठी तो सायन स्टेशनवर लोकलची वाट पाहत होता. यावेळी एका दाम्पत्याने त्याची हत्या केली. सीसीटीव्हीमध्येही घटना कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीला पकडले असून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.
तसेच तिथे असलेले प्रवासी हे सर्व साक्षीदार होते. जेव्हा हे झाले तेव्हा सगळेजण बघत बसले होते. पण त्याला कोणी वाचवलं नाही. त्याला कोणी साधा मदतीचा हातही दिला नाही. ते फक्त पाहतच बसले होते, असे दिनेशचा चुलत भाऊ सुरेशने म्हटले आहे.
तसेच सुरेशने काही नातेवाईकांना घेऊन दादर पोलिस स्टेशन गाठले आहे. तसेच सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की ते दाम्पत्य असे का वागले? त्याचा इतकाच त्रास होता तर मारहाण करण्यापेक्षा पोलिसांना तिथे बोलावलं असतं, असे सुरेशने म्हटले आहे.