तेव्हा वडिलांनी मला ब्लॉक केलं! वडिल रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरने केले मोठे वक्तव्य..

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यांच्या पार्थिवाला मुलगा गश्मीरने अग्नी दिला.

असे असताना मात्र इतके दिवस होऊनही आता प्रेक्षकांनी गश्मीरवर टीकेची झोड उठवली आहे. गश्मीरने वडील रविंद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले नाही, त्यांची काळजी घेतली नाही, असे म्हणत अनेकजण त्याच्यावर टीका करत आहेत.

वडिलांचे अशा पद्धतीने निधन होणं आणि गश्मीरचे त्या ठिकाणी नसणे याबद्दल त्याला दोष देण्यात आला. यावर गश्मीरने लगेच काही प्रतिक्रिया देणे टाळले होते. याबाबत आता तो प्रतिक्रिया देत आहे. आता तो म्हणाला की, कुटुंबियांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर, वीस वर्षांपासून ते वेगळे राहत होते.

पण मुलगा झाला तेव्हा मी त्यांना राहायला बोलवले होते. नातवाला पाहून त्यांचे मन बदलेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. मी त्यांना माझ्या मुलाचे व्हिडिओ पाठवत होतो. दोन तीन दिवसानंतर त्यांनी मला ब्लॉक केले, असे गश्मीरले सांगितले.

मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले आणि मी लक्झरी आयुष्य जगत आहे, असे अनेकांना वाटत होते पण तसे काही नव्हते. त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. एक कुटुंब म्हणून आम्ही काहीही करू शकलो नाही.

आम्ही त्यांचे वेगळं होणं स्वीकारले कारण कोणावरही कुणासोबत राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. त्यांना पाहिजे तेव्हा ते आमच्याकडे राहायला यायचे, आणि पुन्हा निघून जायचे. गेल्या तीन वर्षांत बाबांनी स्वतःला कुटुंबापासूनही दूर केले.

शेजाऱ्यांशी बोलणं किंवा मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करणं सुद्धा त्यांनी बंद केले. आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती उशिरा कळण्याचे हे देखील एक मोठे कारण होते. असा धक्कादायक खुलासा देखील त्याने केला आहे.

मला यापेक्षा अधिक काही स्पष्ट करायचे नाही, कारण मी जे काही बोललो त्याचा गैरसमज होईल. पण आता मी समाधानी आहे, असेही त्याने म्हटले आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला प्रचंड ट्रोल केले गेले. मात्र ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही असेही त्याने म्हटले आहे.