रायगड जिल्ह्यात वीज पडल्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील पेझारी-दिवलांग गावात ही दुर्घटना घडली आहे. रघुनाथ म्हात्रे आणि ऋषिकेश म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत.
पेझारी-दिवलांग गावातील बाप लेक हे शेतात तळ्यावर गेले होते. तिथे त्यांच्यावर वीज कोसळून दोघांना विजेचा तीव्र धक्का बसला. यामुळे त्यांना जोराचा झटका बसला. गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे नेण्यात आले.
यावेळी रघुनाथ म्हात्रे वय वर्षे ५५ यांना मृत घोषित केले. नंतर मुलगा ऋषिकेश म्हात्रे याचेही निधन झाले आहे. दरम्यान, पावसाने कोकणात दाणादाण उडवल्याचं चित्र आहे. घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने म्हात्रे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.
तसेच गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी अलिबाग येथील महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. दरम्यान, कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी जवळ दरड कोसळली आहे. भारतीय हवामान विभागानं कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार पाऊस सुरू आहे.
यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबरपासून मान्सूनचा राज्यातील परतीचा प्रवास सुरु होणार आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली. यामुळे किती पाऊस पडणार हे लवकरच समजेल.