Goregaon Building Fire: आज मुंबईतील गोरेगाव परिसरातील समर्थ सृष्टी या पाचमजली इमारतीला पहाटे भीषण आग लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच याठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले होते. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला, तर २५ ते ३० रहिवाशांची प्रकृती गंभीर आहे.
त्यांच्यावर सध्या रुग्णालय उपचार सुरु आहेत. ही आग पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास लागली. यावेळी इमारतीमधील बहुतांश रहिवाशी झोपेत होते. यामुळे याचा अंदाज कोणाला लागला नाही. यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकल्यानंतर याबाबत माहिती झाली.
ही आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरेपर्यंत कोणालाही याबाबत कल्पना लागली नाही. स्फोटासारखा आवाज झाल्याने काहीजण उठले मग पळापळ झाली. एका रहिवाशाने आगीची धग वाढताच जीवावर उदार होऊन आगीतून मार्ग काढत आपल्या लहान मुलाला आणि कुटुंबीयांना वाचवले.
हा व्यक्ती म्हणाला की, आम्ही झोपलो असताना आजुबाजूच्या लोकांनी दरवाजा ठोठावून आग लागल्याचे सांगितले. आम्ही तातडीने बाहेर आलो. आगीच्या धुरामुळे त्याठिकाणी श्वास घेणे अवघड झाले होते. यामुळे आम्ही पुन्हा माघारी घरात येऊन आग विझण्याची वाट पाहत होतो.
दरम्यान, आग कमी होत नसल्याचे दिसताच आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी मुलाच्या अंगावर शाल पांघरून मिळेल त्या मार्गाने कुटुंबीयांसह खाली आलो. अनेकांना आग लागली होती. पण वेळीच हिंमत दाखवल्याने या सगळ्यांचे प्राण वाचले.
दरम्यान, अग्निशमन दल याठिकाणी पोहोचेपर्यंत इमारतीमधील रहिवाशी जमेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळात याठिकाणी बचावकार्य सुरू झाले, काहीच जीव गेला तर काहीजण यामध्ये वाचले.