रॉ एजंट कसे निवडले जातात? त्यांना कोणतं प्रशिक्षण दिले जाते? वाचून हादरून जालं…

आपण बघतो की अनेक चित्रपटात रॉ एजंटबद्दल भूमिका असते. त्यांचे काम वेगळे असते. मात्र त्यांच्याबाबत कोणालाही जास्त माहिती नसते. याबद्दल अनेकजण इंटरनेटवरून माहिती शोधण्याचा प्रयत्न करत असतात. रॉ एजंट कसे निवडले जातात, त्यांना रॉमध्ये नेमकं काय करावे लागते.

त्यांचे कार्यालय कुठे आहे, हे देखील जाणून घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. भारताच्या गुप्तचर संस्थेचे नाव रिसर्च अँड अनॅलिसिस विंग आहे. रॉ असे भारताच्या या गुप्तचर संस्थेला संबोधले जाते. रॉ चे इंटेलिजन्स यूनिट केंद्रीय कॅबिनेट सचिवालयाच्या अंतर्गत काम करते.

या यूनिटच्या मुख्य अधिकाऱ्याला सचिव (R) असे म्हणतात. त्यांच्या अंतर्गत विशेष सचिव, अतिरिक्त सचिव, विशेष ऑपरेशन विभाग, संरक्षण विभागाचे महासंचालक इत्यादी येतात. मुख्यता दिल्लीमधून त्यांचे काम चालते. देशात काही ठिकाणी त्यांची कार्यालये आहेत.

परदेशातून गुप्त माहिती गोळा करणं हे तसे संवेदनशील काम आहे. भारत सरकार रॉला कॅबिनेटअंतर्गत यंत्रणा म्हणून वर्गीकरण करते. त्यांच्या मोहिमा, आर्थिक व्यवहार इत्यादी गोष्टीही संसदेत जाहीररित्या सांगून सार्वजनिक केल्या जात नाहीत. त्यांचा तपशील गुप्त ठेवला जातो.

कायद्यामधूनच ही सूट ‘रॉ’ला देण्यात आली आहे. त्यांच्या अधिकृत बैठका, परिसंवादांना केवळ ‘रॉ’चे वरिष्ठ आणि अतिमहत्त्वाचे अधिकारीच उपस्थित राहतात. त्यामुळे ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांची ओळख आणि कारवाया यांबाबत गुप्तता पाळली जाते. कारवाई झाल्यानंतर देखील अनेकदा याबाबत कोणाला माहिती होत नाही.

येथे काम करणारांची निवड सिनियर फिल्ड ऑफिसर ते सहाय्यक फिल्ड ऑफिसरपर्यंत सगळ्यांची निवड मुलाखतीद्वारे होते. कॅबिनेट सचिवालयामर्फत निवड प्रक्रिया पार पाडली जाते. यामध्ये अपेक्षित गोष्टी बघितल्या जातात.

तसेच केंद्र आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमधील विशेष कौशल्य असलेले अधिकारी, हवालदार, शिपाई इत्यादींची ‘रॉ’च्या फिल्ड वर्कसाठी निवड केली जाते. यामुळे ही एक कठीण प्रक्रिया असते. तसेच IPS, IRS आणि IFS सेवांसाठी निवडलेल्या उमेदवारांनाही ‘रॉ’ आपल्या विभागात काम करण्यासाठी निवडते.

UPSC मार्फत देखील काही वेळेस गरज असल्यास उमेदवारांशी संपर्क साधून रॉमध्ये सामील होण्यासाठी बोलावले जाते. त्यांना वेगवेगळ्या भाषा, याव्या लागतात. रॉ’मध्ये अत्यंत कठोर प्रशिक्षण असतं. ‘रॉ’ इंटेलिजन्स एजन्सीमध्ये सामील झाल्यानंतर गुप्तचर माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतात.

हे प्रशिक्षण दिल्लीच्या उपनगरातील गुरुग्राम येथे दिले जाते. असामान्य परिस्थितीत कसं काम करावं? परदेशात कसं जायचं? तिथून पळून मायदेशी कसे यायचं? परदेशात पकडल्यास काय करावं? संपर्क काय असावेत? कपडे कोणते परिधान करायचे? अशा अनेक गोष्टींची माहिती दिली जाते. त्यांना भारतीय सैन्यात देखील पाठवले जाते.