Hyderabad News : ‘कसाही असो शेवटी तो माझा मुलगा आहे’, पोटच्या गोळ्यासाठी आईने २२ व्या मजल्यावरुन मारली उडी

Hyderabad News : आपल्या सात वर्षांच्या मानसिक विकलांग मुलाची काळजी घेण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींचं मन वळवू न शकल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलेने इमारतीच्या 22व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली.

हैदराबादमधल्या कुकटपल्ली हाउसिंग बोर्ड कॉलनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. आंध्र प्रदेशातल्या काकीनाडामधल्या समरलाकोटाचा रहिवासी असलेल्या श्रीधरने सर्पवरमच्या रमा वेंकट लक्ष्मी गणपथू स्वातीशी लग्न केलं.

हे जोडपं ‘मंजिरा मॅजेस्टिक होम्स’मध्ये राहत होतं. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला. पण तो मानसिकदृष्ट्या विकलांग होता. हा मुलगा सात वर्षांचा आहे. त्यांची काळजी घ्यावी लागत असे. स्वातीचा पती श्रीधर आणि त्याचे आई-वडील या मुलाचं संभाळ करायला नको म्हणत होते.

त्याला शहरातल्या एखाद्या अनाथाश्रमामध्ये ठेवण्यासाठी ते स्वातीवर दबाव टाकत होते. मात्र याला तिने विरोध केला. यामुळे तिला घरात त्रास होऊ लागला. स्वातीने आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडून आर्थिक मदत घेतली.

असे असताना सासरच्यांनी तिचा आणखी छळ सुरू केला. यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली आणि तिने आत्महत्या केली. स्वाती इमारतीच्या 23 व्या मजल्यावर पोहोचली. तिथून तिने आत्महत्या केली. अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये ती पडली. यामध्ये तिचे निधन झाले आहे.