“पैसे नसतील तर सांग, दानपेटी ठेवतो आणि तुला देतो”, ‘या’ कारणावरून बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकरला झापले

सध्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज माजी क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्याविरोधात आंदोलन केले. यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिनच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत कडू म्हणाले, भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणं योग्य नाही. पैसे नसतील तर सांगा, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो अन् त्यातील पैसे तुम्हाला देतो पण अशी जाहिरात करू नका. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सचिनच्या घराचा परिसर दणाणून सोडला.

यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस देखील तैनात होते. पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन जुगाराची एक जाहिरात केली होती. यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे.

या जाहिरातीत सचिनने काम करण्यावर बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदवला होता. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला मानणाऱ्या तरुणाईवर परिणाम होत आहे. यामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. अनेक तरुणांनी यामुळे आत्महत्या देखील केली आहे.

यामुळे कडू म्हणाले, सचिन तेंडुलकरने एकतर ही जाहिरात सोडावी किंवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी त्याने परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. यामुळे आता सचिन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आधी याबाबत सचिनला माहिती देण्यात आली होती. मात्र त्याने लक्ष दिले नाही. यामुळे बच्चू कडू यांनी सचिनच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आज ते कार्यकर्ते घेऊन याठिकाणी आंदोलन करण्यासाठी आले होते.

दरम्यान, यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. परत करा-परत करा. भारतरत्न परत करा, आमचा देव जुगार खेळतो, अशा घोषणा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.