IND vs AUS: दोनच दिवसांत भारताने घेतला बदला! नवख्या पोरांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवले, ‘हा’ खेळाडू ठरला विजयाचा हिरो

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना (IND vs AUS) 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला गेला. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर २ विकेट्स राखून विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 20 षटकांत 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याचा पाठलाग करण्यासाठी भारतीकडून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल सलामीवीर म्हणून आले.

गायकवाडला खातेही उघडता आले नाही. तो धावबाद झाला आणि त्याला शून्यावर परतावे लागले. जैस्वालही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि १९ धावा करून तो निघून गेला.

त्यानंतर फलंदाजीला आलेला इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यांच्यात मोठी भागीदारी झाली. त्यामुळे भारताने 15 षटकांत 150 धावांचा टप्पा पार केला. मात्र, इशान किशन 39 चेंडूत 58 धावा करून बाद झाला.

मात्र दुसऱ्या टोकाकडून सूर्यकुमारने आक्रमक फलंदाजी करत 29 धावांत अर्धशतक झळकावले. सूर्याने 80 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली. शेवटी रिंकू सिंगनेही त्याला चांगली साथ देत भारताला विजयाचा उंबरठा ओलांडून दिला.

विश्वचषक 2023 चा अंतिम सामना जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ T20 मालिकेत (IND vs AUS) पूर्ण उत्साहाने फलंदाजी करताना दिसला. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत 208 धावा केल्या.

ज्यामध्ये जोश इंग्लिसने 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 50 चेंडूत 110 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि 8 षटकार दिसले. स्टीव्ह स्मिथने डावाची सुरुवात करताना ५२ धावांची खेळी खेळून दणका दिला. मॅथ्यू शॉर्टने 13 आणि टीम डेव्हिडने 19 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय गोलंदाजांची कामगिरी सामान्य होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. या काळात संघात वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई चांगलेच महागात पडले.

प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकात 50 धावा दिल्या, ज्याची इकॉनॉमी 13 च्या आसपास होती. तर त्याला एकच विकेट घेता आली.

तर रवी बिश्नोईने 14 च्या इकॉनॉमीसह 54 धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाने 200 चा आकडा पार करण्यात यश मिळवले. मुकेश कुमारने चांगली गोलंदाजी केली. मुकेशने 4 षटकात 29 धावा दिल्या.