रोहितच्या ‘या’ जबरदस्त चालीत अडकली श्रीलंका, ४१ धावांनी श्रीलंकेचा पराभव करत भारत फायनलमध्ये दाखल

IND vs SL: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) आशिया कपच्या सुपर-4 मध्ये आमनेसामने आले. हा सामना 12 सप्टेंबर रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

लंकेच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज चांगलेच अडकले. त्यामुळे टीम इंडिया केवळ 213 धावांवरच मर्यादित राहिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 10 गडी गमावून 172 धावा केल्या आणि भारताने हा सामना 41 धावांनी जिंकला.

भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना लंकेचे फलंदाज पॉवर प्लेमध्ये बिथरले आणि 24 धावांच्या स्कोअरवर तीन गडी गमावले.

डावाची सुरुवात करण्यासाठी आलेले पथुम निसांका आणि दिमुथ करुणारत्ने हे भारतीय गोलंदाजीसमोर असहाय्य दिसत होते. बुमराहने शानदार गोलंदाजी करत सुरुवातीला लंकेला बॅकफूटवर ढकलले. निसांका 6 धावा करून आणि करुणारत्ने 2 धावा करून बाद झाला.

मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या यष्टिरक्षक कुसल मेंडिसने आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराहने 15 धावांवर मेंडिसचे काम पूर्ण केले. सदीरा समरविक्रमाने 17 आणि चरित असलंकाने 22 धावा केल्या.

दुसऱ्या टोकाकडून धनजय डिसिल्वा खेळपट्टीवर ठाम राहिला. 5 बळी घेणाऱ्या वेललागेने आपल्या फलंदाजीतही विशेष कामगिरी बजावली. दोन्ही खेळाडूंमध्ये 50 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे सामना भारताच्या हातून निसटू लागला.

धनजय डिसिल्वाने ४१ धावा केल्या तर वेल्लालाघे ४२ धावांवर नाबाद राहिला. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. धनंजय आणि वेललागे लागे यांनी शानदार फलंदाजी करत सामना भारताच्या पकडीतून हिसकावून घेतला.

दोन्ही खेळाडूंमध्ये 50 हून अधिक धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारत हा सामना जिंकण्यापासून खूप दूर जात होता. पण कर्णधार रोहित शर्माने मोठी खेळी केली.

डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजा उजव्या हाताचा फलंदाज धनंजयच्या समोर आणण्यात आले. जडेजाने चतुराईने गोलंदाजी करत सेट फलंदाज धनंजय डिसील्व्हाला 41 धावांवर मिडऑनला झेलबाद केले.

श्रीलंकेविरुद्ध भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. रोहित शर्मासोबत डावाची सलामी देण्यासाठी आलेला शुभमन गिल 25 चेंडूत 19 धावा करून स्वस्तात बाद झाला.

तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध १२२ धावांची खेळी केली होती. पण आज विराट कोहली लंकेविरुद्ध 3 धावा करून बाद झाला.

मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या केएल राहुलने भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तो दुर्दैवी 39 धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा फक्त 4 तर हार्दिक पांड्या फक्त 5 धावा करू शकला. तर अखेरीस अक्षर पटेलने २६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.