IND vs SL: आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SL फायनल) यांच्यात खेळला गेला. इतिहासाच्या पानांमध्ये नाव नोंदवण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये दाखल झाले.
नाणेफेकनंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज पत्त्यासारखी कोसळले.या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ ५० धावांत गारद झाला.
या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 10 गडी राखून सहज विजय नोंदवला आणि 8व्यांदा आशिया चषक जिंकला. तब्बल २६३ चेंडू म्हणजेच ४४ षटके बाकी असतानाच टिम इंडीयाने विजय मिळवला.
आशिया चषक 2023 च्या ऐतिहासिक सामन्यात श्रीलंकेचा 50 धावांत पराभव झाला. अंतिम सामना जिंकण्यासाठी भारताला 51 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारताच्या सलामीच्या जोडीत मोठा बदल झाला.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा नाही तर डावखुरा फलंदाज इशान किशन शुभमन गिलसोबत आला. दोन्ही खेळाडूंनी येताच आपले इरादे स्पष्ट केले आणि लंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला.
त्यामुळे भारताने हा सामना ६ ओव्हरमध्येच जिंकला. गिल आणि किशनने दोघांनीच हा सामना जिंकवून दिला. १० गडी आणि २६३ चेंडू बाकी ठेऊन मिळवलेला विजय हा इतिहासातील भारताचा सर्वात मोठा विजय ठरला
संपूर्ण स्पर्धेत श्रीलंकेचे फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसले. मात्र अंतिम सामन्यात भारताविरुद्धचे दडपण सांभाळता आले नाही. त्यामुळे विकेट्स पडल्याचं दिसत होतं. भारतीय गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करत लंकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.
सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत 6 बळी घेत श्रीलंकेला 50 धावांवर शरणागती पत्करण्यास भाग पाडले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने 1 आणि हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या.
लंकेसाठी एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कुशल मेंडिझने सर्वाधिक १७ धावांची तर दुशान हेमंताने १३ धावांची सर्वाधिक खेळी खेळली.
टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने 3 आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली. डावाच्या चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने प्रथम पथुम निशांकाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, त्यानंतर दोन चेंडूंनंतर सदीरा समरविक्रमा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
शेवटच्या सामन्याचा हिरो असलेल्या चरित असलंकालाही पहिल्याच चेंडूवर इशान किशनने झेलबाद केले पण पुढच्याच चेंडूवर धनंजय डी सिल्वाने चौकार ठोकला. मात्र, सिराज इथेच थांबला नाही, त्याने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धनंजयला बाद करून श्रीलंकेला धक्का दिला.
सिराजने एकाच षटकात 4 बळी घेण्याचा पराक्रम केला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा तो तिसरा आणि पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
१९३२ मध्ये भारताने क्रिकेट विश्वात प्रवेश केला. पण, 91 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये असा एकही गोलंदाज दिसला नाही ज्याने एका षटकात 4 विकेट्स घेऊन विरोधी संघाचा नाश केला असेल. अंतिम फेरीत सिराजने अवघ्या 16 चेंडूत आपले पंजे उघडले आणि श्रीलंकेच्या संघाला उद्ध्वस्त केले.