Jalgaon news : रात्री झोपले अन् सकाळी घडलं भयंकर! वृद्ध दाम्पत्याने घेतला टोकाचा निर्णय, उडाली खळबळ…

Jalgaon news : जळगावमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथील भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे वृद्ध दाम्पत्याने एकाच वेळी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत रामगीर ओंकार गोसावी (९०) आणि मंडाबाई रामगीर गोसावी (८०, रा. खेडगाव ता. भडगाव) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध दाम्प्त्याचे नाव आहे. रात्री ते झोपले होते मात्र सकाळी उठलेच नाहीत. आजारपणाला कंटाळून या दाम्पत्याने मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीच्यावेळी आजाराला कंटाळून विषारी औषध प्राशन करत त्यांनी आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी उशिरापर्यंत झोपेतून न उठल्याने त्याचा मुलगा त्यांना उठवायला गेला.

तेव्हा मुलाला धक्काच बसला. त्याला घरात आई-वडिलांचा मृतदेह आढळून आला. त्याने इतरांना ही माहिती दिली. त्यांच्या पश्चात निवृत्त पोलीस असलेला मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रामगीर गोसावी यांना दम्याचा त्रास होता, यामुळे ते या त्रासाला कंटाळले होते.

यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. रामगीर गोसावी यांची दोन एकर शेती आहे. मुलगा मोतीगीर गोसावी हे सेवानिवृत्तीनंतर वडिलांसोबत होते. अचानक ही घटना घडल्याने कुटुंबासह शेजाऱ्यांना धक्का बसला आहे. याबाबत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत मोतीगीर रामगीर गोसावी यांच्या खबरी वरून भडगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे दिवाळीत गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.