Jalna Accident : बाईकमध्ये पेट्रोल भरायला जाताना घडलं भयंकर, भीषण अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू

Jalna Accident : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात मात्रेवाडी एक भीषण अपघात झाला आहे. येथील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली.

या दुर्दैवी अपघातात ३ जण जागीच ठार झाले. या अपघातात बापलेक आणि आणखी एक जण जागीच ठार झाले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टर हा बाईकला धडकल्याने हा भीषण अपघात घडला.

हा अपघात खूपच भयानक होता. यामध्ये बाप लेकाचे शिर अक्षरशा: धडावेगळे झाले. येथील लोकांनी अपघाताची माहिती बदनापूर पोलिसांना कळवली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने मृतांचे शव ट्रॅक्टर खालून काढले.

यावेळी मोठी गर्दी झाली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे पाठवले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अकोला आणि निकळक या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

यामध्ये ज्ञानेश्वर साहेबराव साबळे, युवराज ज्ञानेश्वर साबळे आणि आत्माराम कारभारी म्हसके असे तिघा मृतांचे नावे आहेत. या अपघातात बाईकचा चक्काचूर होऊन तिघेही ट्रॅक्टरमध्ये फसल्याने त्यातच तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.