काही लोक म्हणतात शेती म्हणजे जुगार असतो. ज्यामध्ये लावलेले पैसे परत भेटतील की नाही याची गॅरंटी नसते. पण सातत्य आणि नियोजनाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी चांगल्याप्रकारे शेती करुन बक्कळ पैसा कमवता येतो हे सिद्ध करुन दाखवले आहे.
अशाच एका शेतकऱ्याची राज्यभरात चर्चा होत आहे. जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील शेतकरी ईश्वर गायकर हा फक्त दोन महिन्यात करोडपती झाला आहे. त्याने आणि त्याची पत्नी सोनाली गायकरने टोमॅटोची लागवड केली होती. यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळाले आहे.
ईश्वर आणि त्याची पत्नी सोनाली यांनी १२ एकर शेतीमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. या दोन महिन्याच्या लागवडीतून त्यांना तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे या जोडप्याची राज्यभरात चर्चा होत आहे.
ईश्वर आणि सोनाली या दोघांनीही पण १२ पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. दोघांनीही नियोजन करत शेतीतील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. कच्चामाल, शेतीसाठी लागणारी सामग्री या गोष्टींची पुर्णपणे जबाबदारी ही ईश्वरने आपल्या खांद्यावर घेतली होती.
सोनालीचे १२ सायन्स झाले आहे. त्यामुळे तिने इतर गोष्टींमध्ये लक्ष दिले. तिने शेती मशागतीसाठी लाघणारे मनुष्यबळ, हवामानाचा अंदाज आणि इतर गोष्टी बघितल्या. या सर्व गोष्टींचे नियोजन दोघांनी योग्यप्रकारे केल्यामुळे याचा त्यांना चांगलाच फायदा झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून ते टोमॅटोचे उत्पन्न घेत होते. पण आता टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यामुळे ते दोन महिन्यातच करोडपती झाले आहे. त्यांनी ६० हजार टोमॅटो रोपांची लागवड केली होती. एप्रिल महिन्यात त्यांनी १२ एकर शेतात ही लागवड केली होती. फवारणी, औषधे, मांंडव करणे, टोमॅटो बांधणी, मजुरी असा त्यांना ४० लाख रुपये खर्च आला होता.
शेतीतील आतापर्यंत १५ टोमॅटो तोडे झाले असून त्यामध्ये १५ हजार कॅरेट टोमॅटो निघाले आहे. त्यातून त्यांना २ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच अजून ६ ते ७ हजार कॅरेट आणखी निघणार असल्याचे जोडप्याने सांगितले आहे. त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्नही कोटींच्याच घरात असणार आहे.