सहा महिन्याचं बाळ नक्की कसं पडलं? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

कल्याणमधील बाळ पाण्यात पडल्याच्या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मुसळधार पावसामुळे लोकल थांबली होती. त्यामुळे एक महिला आपल्या वडिलांना आणि सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे रुळावरुन चालली होती.

त्यावेळी ते बाळ महिलेच्या वडिलांकडे होते. रुळावरुन चालत असताना त्या आजोबांचा पाय घसरला आणि ते बाळ थेट नाल्यात पडले. आता या घटनेला २४ तास उलटून गेले आहेत, पण अजूनही ते बाळ सापडलेले नाही.

प्रशासनाकडून सुरु असलेली शोध मोहिम अखेर गुरुवारी थांबवण्यात आली आहे. योगिता रुमाले असे त्या महिलेचे नाव आहे. त्या प्रसुतीसाठी वडील ज्ञानेश्वर यांच्याकडे आल्या होत्या. सहा महिन्यांपासून त्या तिथेच राहत होत्या.

मुलगी रिषिताची तब्येत ठिक नसल्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे तिला तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जावे लागत होते. ते परत येत असताना लोकल डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान बराच वेळ थांबली होती. तेव्हा ते पायी जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेबाबत आजोबांनीच सांगितले आहे.

आम्ही वाडिया रुग्णालयातून परत होतो. कोपरला उतरायचं होतं. पण लोकल खुप वेळ झाली थांबलेली होती. सर्व लोक खाली उतरून पायी जात होते. त्यामुळे आम्ही पण पायी जाण्याचा विचार केला, असे त्या आजोबांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, खाली उतरल्यानंतर माझी नात माझ्या हातात होती. तर माझ्या मुलीला मी हळु हळु पुढे जाण्यास सांगत होतो. त्यावेळी एका पाईपावरुन जात असताना माझी मुलगी घसरली. त्यावेळी मीही तिच्या मागे होतो, त्यामुळे मीही थोडा घसरलो. पण त्यावेळी आम्ही सावरलो पण माझ्या हातातून माझी नात सुटली.

संपुर्ण लोकलच खाली होत होती. त्यामुळे आम्ही खाली उतरलो होतो. कारण दोन-तीन तासांपासून ती लोकल थांबलेली होती. त्यामुळे आम्ही पायी स्टेशनपर्यंत जाण्याचा विचार केला. आम्ही खाली उतरुन जात होतो. त्याचवेळी ही घटना घडली, असे त्या आजोबांनी सांगितले आहे.