Kalyan News : कल्याण खडकपाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने नऊ महिन्याआधी उत्तर प्रदेशमधील २० वर्षीय तरुणीशी लग्न केले. त्याने कल्याण पश्चिमेतील एका चाळीत आपला लग्नाचा संसार मांडला.
असे असताना तो बेकरीत कामाला गेल्यानंतर पत्नी घरी एकटीच होती. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घराच्या खिडकीतून एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्याने तिच्या गळ्यावर आणि तळहातावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये ती जखमी झाली.
तिने आरडाओरडा केल्यानंतर जवळचे लोक जागे झाले. घटनेची तिच्या नवऱ्याला माहिती देण्यात आली. पती हा घरी पोहोचेपर्यंत हल्ला करणारा हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलीस तपास करत असताना त्यांना घराजवळ एक चप्पल आढळून आली. आजूबाजूला शोध घेतला असता एका महिलेने ही चप्पल तिच्या मुलाची असल्याची माहिती पोलिसांना दिली. यामुळे पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला.
हा आरोपी त्यावेळेस आपल्या दुचाकीने परिसरात आला होता. पोलिसांना पाहताच तो निघून गेला होता. यामुळे संशय अजूनच बळावला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत ६ तासात त्याच्या मुसक्या आवळ्याला आहेत. अशा प्रकारे आरोपीचा शोध पोलिसांनी लावला.