कामावरुन काढल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या मॅनेजरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडनेर येथे रात्री उशिरा ही घटना घडली आहे. यामुळे पोलीस तपास करत आहेत.
खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय. २४ वर्ष, रा. चेंबूर, मुंबई) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर शाहिद रफीक बागवान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, त्याला शिरूर न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की, वडनेर – फाकटे रोडवर वडनेर येथे जाकीर गफार सय्यद यांचे फार्म हाऊस आहे. त्यांचाच नातेवाईक असलेला आत्ताऊल्ला खान हा तेथे वास्तव्यास राहून फार्म हाऊसवरील सर्व कामे पहात होता.
आरोपी शहीद बागवान हा त्यांच्याकडे कामासाठी आला होता. त्यामुळे तिथेच राहत होता. मात्र त्याच्या कामात दिरंगाई दिसल्याने त्याला खान यांनी कामावरून काढून टाकले होते. त्याच गोष्टीचा राग बागवान याच्या मनात घर करून होता. त्यानुसार बागवान याने राहत असलेल्या खोलीत खान याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला.
खून केल्यानंतर त्याने फार्म हाऊसमधील सर्व खोल्यांना आतून कड्या लावून तो पळून गेला. मात्र तिथे काम करणाऱ्या इतर कामगारांना संशय आल्याने त्यांनी कड्या उघडून पाहिले तर खून केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला जांबूत येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीने खुनाची कबुली दिली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.