कोल्हापुरात वाढत्या रोडरोमियाोंमुळे पोलिस पथक कारवाया करत आहे. तसेच ज्या कॅफेत अश्लील चाळे सुरु आहेत, तिथे पोलिस छापे टाकत आहे. शुक्रवारी पोलिसांनी कोल्हापूरातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.
उमा टॉकीजच्या परिसरामध्ये असलेल्या कॅफेंमध्ये अंधार करुन अश्लील चाळे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर निर्भया पथकाने छापा टाकत या जोडप्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच मिरजकर, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर याठिकाणीही त्यांनी छापे टाकले आहे.
काही दिवसांपूर्वीच शाहू मैदानाच्या बसस्थानकावर ३ तरुणांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनींची छेड काढली होती. त्यानंतर संतापलेल्या जमावाने त्यांची धुलाई केली होती. त्याप्रकरणी ३ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
३ तरुणांनी भरदिवसा मुलींच्या छेड काढल्यामुळे कोल्हापूरात, तरुणी, महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. तसेच त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
पंडीत यांनी कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या अवैध गोष्टींवर आळा घालण्यासाठी छापे टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना अशी माहिती मिळाली की, काही कॅफेंमध्ये गैरप्रकार सुरु आहे. त्यानुसार त्यांनी छापे टाकले.
कॉलेजच्या नावाखाली अंधाऱ्या खोलीत कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरु होते. त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यात चार जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अचानक छापा टाकल्यामुळे जोडप्यांची तारांबळ उडाली होती.
भविष्यातही ही कारवाई अशीच सुरु ठेवणार आहे. कोल्हापूरात ज्याठिकाणीही अवैध व्यवसाय सुरु आहे, गैरप्रकार सुरु आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच विद्यार्थीनी, महिला, तरुणींना कोणी छेडत असेल तर त्यांनी निर्भया पथकाकडे त्याची तक्रार करावी, असे महेंद्र पंडीत यांनी म्हटले आहे.