Mahabaleshwar News : सख्ख्या थोरल्या भावाला मेसेज करून धाकट्या भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना महाबळेश्वर येथे उघडकीस आली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
महाबळेश्वर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मेटतळे हे गाव आहे. या गावातील गणेश दत्तात्रय शिंगरे (वय ३२) याचा लहान भाऊ किरण शिंगरे हा काम नसल्यामुळे घरीच होता. रात्री किरण हा त्याच्या खोलीमध्ये नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला.
त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये त्याचा मोठा भाऊ गणेश हा झोपण्यासाठी गेला. सकाळी गणेशला जाग आली. त्यावेळी त्याने व्हाँट्सअँप पाहिले असता त्याच्या लहान भाऊ किरणने त्याला मेसेज पाठविल्याचे दिसले. हा मेसेज बघून त्याला धक्काच बसला.
त्याच्या रूमकडे तो धावतच गेला. त्याला हाक मारली व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा दरवाजा आतून बंद होता. सर्वांनी मिळून तो दरवाजा अखेर तोडला. त्याच्या खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केला असता घरातील अँगलला नायलॉनच्या रस्सीने किरणने गळफास घेतला होता.
त्याच्या शेजारील लोकांनी गळफासाची रस्सी कापून त्याला खाली उतरवले. मात्र त्याचे निधन झाले होते. त्याने मेसेजमध्ये म्हटले होते की, सॉरी दादा मी या आयुष्याला वैतागलोय. सगळीकडून मी अडकत चाललो आहे.
याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला दाखवू नको. डीलीट कर. पप्पांना साॅरी सांग. मी मोबाइल अँपवरून ऑनलाइन लोन घेतलेले आहे. ते मला फेडता येत नाही. ते सकाळी अकरा वाजायच्या आत भरून टाक. माझी शपथ आहे. कोणाला सांगू नको. मिस यू, असे म्हटले होते, घटनेने सर्वांचा एकच धक्का बसला.