जुलैत मुसळधार, ऑगस्टमध्ये किती बरसणार? पुढच्या २ आठवड्यांसाठी ‘असा’ असेल पाऊस; IMD ची माहिती

राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पुर आले आहेत, तर काही ठिकाणी नद्यांची पातळी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशाराही प्रशासन देत आहे.

जुलैमध्येच इतका मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुढील महिन्यात किती पाऊस पडणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पुण्यात पाऊस कमी आहे. पण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबईत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली होती. विदर्भात वर्धा, गडचिरोली, यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच अमरावती, भंडारा, गोंदिया आणि वाशिममध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणही भरताना दिसत आहे.

जुलै महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला असला तरी ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने लावला आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी त्याचे प्रमाण कमी होताना दिसेल. शुक्रवारपासूनच पावसाचा जोर कमी होताना दिसणार आहे. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक धरणे भरली आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा यावर्षीचा पाणी प्रश्न मिटला आहे.

पाऊस कमी होणार असल्यामुळे कोल्हापूरवरचे मोठे संकट दूर झाले आहे. शुक्रवारपासून पाऊस कमी होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरावरील महापूराचे संकट दूर झाले आहे. यामुळे ज्या नागरिकांना स्थलांतर करावे लागले होते. त्यांनाही पुन्हा घरी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा पुर्ववत सुरु होणार आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत होती. त्यामुळे महापूराची भिती व्यक्त केली जात होती. नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्याही सुचना प्रशासनाने दिल्या होत्या. पण आता तो धोका टळल्यामुळे नागरिकांना पुन्हा आपल्या घरी जाण्याच्या सुचना देण्यात आल्याा आहे. आढावा बैठक घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.