Majalgaon News : भांडण करून मुलगा 8 दिवस घराबाहेर, वडिलांनी पुन्हा घरी आणले, अन् गाडी घेतली नाही म्हणून त्याने वडिलांनाच संपवलं…

Majalgaon News : माजलगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मोटारसायकल घेऊन न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याची झोपेतच डोक्यात खोरे मारून हत्या केल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील टाकरवण येथे ही घडली. ग्रामीण पोलिसांनी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक केली आहे. लक्ष्मण भुंबे याने वडिलांकडे मोटारसायकल हवी म्हणून तगादा लावला होता. पहाटे ४ वाजता साखर झोपेत असलेल्या वडिलांवर त्याने खोऱ्याने डोक्यात वार केले.

यामुळे ते जखमी झाले. त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. काही वेळातच रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

मारोती लक्ष्मण भुंबे असे मृत वडिलाचे नाव आहे. बालू उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे ( वय ३१) या आरोपी मुलाचे नाव आहे. मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आठ दिवसांपूर्वी लक्ष्मण भुंबे हा रागाच्या भरात गायीला खोरे मारून घरातून निघून गेला होता. आठ दिवस तो घराबाहेरच होता. वडिलांनी त्यास शोधून घरी आणले. मात्र, त्याने त्यांनाच संपविले. यामुळे या प्रकरणाची सध्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे. मानसिक अस्थिरतेतून त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. कुटूंबाने याबाबत माहिती दिली आहे.